उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

बारामती, दि. १६: बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात येईल; अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्राला राज्यशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

कृषी विज्ञान केंद्र माळेगाव खु. येथे आयोजित ‘कृषिक २०२५’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर, आयआयटी खरगपूरचे शास्त्रज्ञ डॉ. पियुश सोनी, ॲग्री पायलटचे प्रकल्प संचालक प्रशांत मिश्रा, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेयरमन राजेंद्र पवार, विश्वस्त प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, दरवर्षी आयोजित ‘कृषिक’ प्रदर्शनात बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर करुन बी-बियाणे, पिके, फुले व फळांच्या जाती, भाजीपाल्यामध्ये संशोधन करुन अधिकची भर पडत आहे. यावर्षीच्या प्रदर्शनात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हे एक नवीन आकर्षण आहे. या प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देवून नवनवीन गोष्टी आत्मसात करतात, आपल्या शेतात त्याचा वापर करतात. त्यामुळे खऱ्याअर्थाने या प्रदर्शनाला एक वेगळ्या प्रकारची उंची प्राप्त झालेली आहे. जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येतो, आता शेतकऱ्यासमोर दुष्काळ, पर्जन्यमानाची अनियमितता, घटते जमिनीचे क्षेत्र अशी विविध प्रकारची आव्हाने उभी असून त्यावर मात करण्याकरीता प्रयत्न करावेत. राज्यात कृषी विषयात विविध संशोधन होत असून यामधून नव्याने उदयास आलेली बी-बियाणे, पिके, फुले व फळांच्या जातींची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  उत्पादनात वाढ होण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांनी ऊसक्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, उसाच्या नवनवीन वाणाची लागवड करावी. शेतमालाची उत्पादकता वाढविण्याकरीता राज्य व केंद्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल. कृषी विभागाच्या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी, साखर कारखान्यातील शेतकी अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा, असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

 

शेतकऱ्यांना विविध योजनांचा पारदर्शकपद्धतीने लाभ देण्याकरीता तंत्रज्ञानाचा वापर करणार- कृषीमंत्री

कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, शेती विषयात होणारे संशोधन, तंत्रज्ञान, नवीन प्रयोगाचा, तसेच विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहचविणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल. त्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येईल. यादृष्टीने शेतकऱ्यांचा सर्वांगीण विचार करुन ॲग्रीस्टॉक संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाच्या विक्रीकरीता शहरी भागात तसेच आठवडी बाजारपेठांमध्ये जागा राखीव ठेवण्याबाबत विचार करावा लागेल. लोककल्याणकारी योजनांचा प्रभावीपणे लाभ देवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल.  बारामती कृषी विज्ञान केंद्राचा दर्जा व गुणवत्तेत सातत्य राहील यादृष्टीने उत्तम नियोजन करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडेल असे विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करुन समाजाला दिशा देण्याचे केंद्राने काम केले आहे, त्यामुळे ही संस्था देशात क्रमांक एकची संस्था आहे. प्रयोगशाळा स्थापन करुन नवनवीन संशोधनाकरीता कृषी विज्ञान केंद्राला राज्यशासनाच्यावतीने जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, याकामी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ॲड. कोकोटे यांनी केले.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शेतीत गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आगामी काळात बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याकरीता सकारात्मक विचार करण्यात येईल. ‘कृषिक’ प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी शिकता आल्या, याचा दुष्काळी भागात निश्चित उपयोग होईल. यापुढे अशाच प्रकारचे प्रदर्शन प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात यावे, असेही श्री. मुंडे म्हणाल्या.

ज्येष्ठ खासदार श्री. पवार म्हणाले, जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागृती होत असून त्यामुळे विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन येत्या काळात होणार आहे. खत, पाणी, पीक, रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादनाचा अंदाज आणि हवामानानुसार पीक पद्धतीचे नियोजन याकरीता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज आहे. याकामी केंद्र सरकार व राज्य शासन मिळून पूर्ण ताकतीने काम करीत आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्रीमती सुळे म्हणाल्या, आगामी काळाची गरज लक्षात घेता बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टच्यावतीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांती घडविण्याच्यादृष्टीने प्रयोगशील उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कार्यात केंद्र सरकार व राज्य शासनासोबत ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि विद्या प्रतिष्ठान काम करीत आहे, असेही श्रीमती सुळे म्हणाल्या.

यावेळी श्री. प्रतापराव पवार यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच श्री. राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात कृषिक प्रदर्शनाची माहिती दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करुन गौरविण्यात आले. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन आणि बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *